जिल्हा जलसंधारण विभाग
महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक :जजमि२०१९/प्र.क.१३८/पापु-१०(०७) दि. ०४ सप्टेंबर, २०२० या शासन निर्णयानुसार सन २००९ – १० पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन, पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC-Functional Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे हे उद्दिष्ट आहे. यात फक्त योजना पुर्ण करणे एवढाच उद्देश नसुन कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे. केद्र शासनाच्या कार्यरत मार्गदर्शक सुचनांनुसार जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी करणे आणि मिशन अधिकाधिक परिणामकारक करणे.
१) जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा (Drinking water security) देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही किमान भारतीय दर्जा- BIS : १०५०० अशी असावी असे अपेक्षित केले आहे.
२) राज्यातील प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीव्दारे (Fuctional Household Tap Connections) पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील ४ वर्षाचे नियोजन करण्यात यावे.
३) जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुबांस सन २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन दयावयाची आहे. यानुसार गाव कृती आराखडा (VAP), जिल्हा कृती आराखडा (DAP) व राज्य कृती आराखडा (SAP) तयार करावा. सदर कृती आराखडयामध्ये दयावयाच्या नियोजित घरगुती नळ जोडण्याचे व त्याकरिता आवश्यक असणाऱ्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन यांचा समावेश असावा. गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी अंमलबजावणी सहाय्य संस्था (ISA), ग्रामीण पाणी पुरवठा विभाग/उपविभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची मदत घेण्यात यावी.
ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अंतर्गत स्थापित ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असून ग्रामसेवक पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. ही समिती जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यान्वित नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी योजनांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल दुरुस्ती करेल. ग्राम पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जल जीवन मिशन आणि सार्वजनिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या मार्गदर्शक सुचनांनुसार बैंक खाते असेल आणि जल जीवन मिशन आणि सार्वजनिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या मार्गदर्शक सुचनां आणि ग्रामपंचायत लेखा संहितेनुसार त्याचे आर्थिक व्यवहार करण्यात येतील. ही समिती जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करेल.
१) गावातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्याची संपूर्ण जबाबदारी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ची असेल.
२) गाव कृती आराखडा तयार करणे, गावातील गाव अंतर्गत (In village) पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, रचना, अंमलबजावणी, देखभाल-दुरुस्ती इ. ची जबाबदारी ही ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ची असेल.
३) राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडून मध्यवर्ती निविदा प्रक्रियेनुसार निवडण्यात आलेल्या संस्थांकडून/पुरवठादारांकडून बांधकाम सेवा/वस्तू/साहित्य प्राप्त करुन घेणे व त्या संस्थेकडून योजना राबवून घेणे.
४) त्रयस्थ संस्थेकडून होणाऱ्या योजनेच्या तपासणी व कार्यक्षमता मूल्यांकनाची व्यवस्था करणे.
५) योजनांचे सामाजिक लेखापरिक्षण हाती घेणे.
६) गावातील पाणीपुरवठा योजनेच्या पायाभूत सुविधाच्या भांडवली किमतीच्या ५% किंवा १०% लोकवर्गणी (आर्थिक/श्रमदान स्वरुपात) देण्याबाबत गावकऱ्यांना प्रोत्साहीत करणे. पाणीपट्टी आकारणे व वसुली करणे.
वरील ठळक बाबींसह केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इतरही कामे करेल
राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सदर जल जीवन मिशन ५०:५० टक्के केंद्र व राज्य हिश्याने राबविण्यात येईल.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत एकूण ५५ कामे असून १७ कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे प्रगतीत आहे.