Combined Ayushman Bharat- Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (PMJAY/MJHJAY)
योजनेविषयी – महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) 2 जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली. सदर महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. • आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दि. 23 सप्टेंबर, 2018 पासून भारत सरकारव्दारे लागू करण्यात आली. या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित होती. ही योजना 2018 ते 2020 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली. सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा 60:40 च्या प्रमाणात आहे. • वरीलप्रमाणे राबविण्यात येत असलेल्या एकत्रित योजनेत शासनाने दि. 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या. त्यानुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.50 लक्ष रकमेचे विमा संरक्षण पुरविले जात होते. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5.00 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण लागू होते. सदर योजना दि.1.04.2020 ते दि.30.06.2024 या कालावधीत राबविण्यात आली. • दरम्यान महाराष्ट्र सरकारने दि.28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानुसार दि. 1 जुलै 2024 पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे. ही योजना अंगीकृत रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोखरहित दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते. ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. • एकत्रित योजने ठळक वैशिष्ट्येः o महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण o अंगीकृत रुग्णालयांमध्ये रोख रक्कम रहीत व्दितीय व तृतीय प्रकारचे उपचार o प्रति वर्ष रु. 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. o रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया उपचारांच्या वैद्यकीय सेवा योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत. o महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय/खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. o प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो. o योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जेथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवांबद्दल तक्रार करू शकतात o योजना पूर्णपणे कागदविरहीत व संगणक प्रणालीव्दारे राबविली जाते. o लाभार्थ्यांना मदत आणि सहाय्य पुरविण्याठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र नियुक्त केले आहेत. o आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे सूचना देऊन रुग्ण उपचार घेऊ शकतात. • विस्तारित योजनेचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः o आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (गट-अ) लाभार्थी: सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना, 2011 (SECC) मध्ये नोंदविलेली कुटुंबे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) मधील समाविष्ट अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य गटातील (PHH) कुटुंबे